श्री तुकाराम दादा पाटील
☆ कवितेचा उत्सव ☆ हल्ली…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
हल्लेच श्वापदांचे झालेत खूप हल्ली
रानातले शिकारी दमलेत खूप हल्ली
भलतेच बदल झाले वस्तीत पाखरांच्या
राव्यात कावळे ही लपलेत खूप हल्ली
बाजारपेठ ज्यानी काबीज आज केली
त्यांनीच देह त्यांचे विकलेत खूप हल्ली
भलत्याच चोचल्यानी केली दिवाळखोरी
त्यांचे लिलाव येथे घडलेत खूप हल्ली
रांधून वाढणारे गेले मरून सारे
बांधावया शिदोरी आलेत खूप हल्ली
जे पोसले बळे ते माजूरडे निघाले
खाऊन सकस खाणे सुजलेत खूप हल्ली
ऐकून भामट्यांची भलती मधाळ वाणी
स्वप्नात गुंतलेले फसलेत खूप हल्ली
सुखरूप मार्ग नाही जगण्यास आज उरला
वाटेत खाच खळगे पडलेत खूप हल्ली
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈