☆ कवितेचा उत्सव ☆ वज्रदेही ☆ श्री प्रकाश लावंड ☆
ना हाकाटी ना बोभाटा
बुजून गेल्या साऱ्या वाटा
रान काटेरी माजलेले
पाय थकलेले पल्ला मोठा।।
कडे कातीव दऱ्या ताशीव
निसरडे दगड घोटीव
भणाण वारा भेलकांडतो
भिती दाखवी खडा चढाव
किती परीक्षा पाहतोस
रौद्ररूपा सांग विराटा ।। १।।
काळोखा कर आकांडतांडव
तोंड पसरून भिती दाखव
नजर माझी प्रकाशमान
आणिक तगडे माझे सौष्ठव
तेजोमय झाले बघ माझे
शिवार,घर,अंगण ओटा ।। २।।
माझा प्रवास नाही सस्ता
माझ्यासाठी ना हमरस्ता
जीव पणाला नित्य लावतो
काळी माय कसता कसता
घामानं भिजवून माती
रेखीन माझ्या मीच ललाटा ।। ३।।
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.#e-abhivyakti
मोबा 9021497977
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈