श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ निखाऱ्यासारखे… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
हे जिणे होते निखाऱ्यासारखे
भेटणारे लोक वाऱ्यासारखे
*
नेमके ना बोलणे झाले कधी
बोलणे माझे पसाऱ्यासारखे
*
लाभले ना प्रेम कोणाचे कधी
सर्वही दूरस्थ ताऱ्यांसारखे
*
भोगली आजन्म दु:खे.. वेदना
भेटलेले सौख्य पाऱ्यासारखे
*
मी मनस्वी हासलो होतो जरी
हासणे झाले बिचाऱ्यासारखे
*
ना घडे हातून या काही.. कधी
वागणे माझे विचाऱ्यासारखे
*
बासरीचा सूर होतो आर्त मी
वाजणारे ते नगाऱ्यासारखे
*
मुक्त केंव्हा वावरू ‘त्याने’ दिले?
दुःख जन्माचे पहाऱ्यासारखे
*
चिंब होते व्हायचे त्या श्रावणी
वर्षले जे; ते फवाऱ्यासारखे
*
मौन संवादापरी होते तुझे
पाहणे होते इशाऱ्यासारखे
*
लोक सारे टाळुनी जाती मला
भात-लिंबाच्या उताऱ्यासारखे
*
जन्म हा माझा तहानेला तुझा
राहणे झाले किनाऱ्यासारखे
*
मेघ आषाढी तशी होतीस तू
चित्त हे माझे पिसाऱ्यासारखे
*
‘सावजा’चे काढले आयुष्य मी
भेटले सारे शिकाऱ्यांसारखे
*
“या.. ” तुझे आपुलकीचे शब्द हे
नेहमी होते निवाऱ्यासारखे
*
स्वार्थसाधूंचीच सारी नाटके
साव ही… होती भिकाऱ्यासारखे
*
वागता ना बोलता आले मला
मी जगावे कोंडमाऱ्यासारखे
*
वाट काट्याची.. उन्हे.. पाऊसही
वाहिले आयुष्य भाऱ्यासारखे
*
फाटक्याने रे जगावे लागले
दैव माझे वाटमाऱ्यासारखे
*
चोख मी होतोच सोन्यासारखा
तोलले त्यांनी घसाऱ्यासारखे
*
संपुनी संपेचिना आयुष्य हे
वाटते आहे ढिगाऱ्यासारखे
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈