सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ मनवारी… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

☆ 

देव पहावा पहावा

देव नाचूनही गावा

देव मस्तकी धरावा

देव जीविचा विसावा…

*

देव दाट घनदाट 

मोर नाचतो वनात

देव कस्तुरी नाभीत 

देव आत आत आत…

*

डोळे पाहती कौतुक 

जग सोहळे अप्रूप

डोळे आत वळवत 

देव तेथेचि डोलत…

*

धुंद आनंदी आनंद 

कसा वसे हा देहात

जेव्हा मन शांत शांत 

चित्त एकाग्र अभंग….

*

“वारी” मनाची विरक्ती 

नको देहाची आसक्ती 

नसे वेगळी हो‌ मुक्ती

“आस नाही” ही निवृत्ती….

*

नको वाट संसाराची

“मनवारी” या देवाची

कृतार्थता या जन्माची

आस सुफळ देवाची…

*

देव पहावा पहावा

देव नाचूनही गावा

देव मस्तकी धरावा

देव जीवीचा विसावा…

☆ 

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

(वारी म्हणजे “चालणे” व वारी म्हणजे “हरण कर” … एकच शब्द द्विअर्थाने)

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments