सुश्री नीलिमा खरे
कवितेचा उत्सव
☆ गजानन वंदन ☆ सुश्री नीलिमा खरे ☆
☆
हे गजानना वेध जीवा तुझ्या आगमनाचे
या जगती भासते मना तुझेच रूप साचे
*
ओंकाराचे ब्रह्मतत्व विलसते गजवदनी
पूजन प्रणवाचे चरणी पुष्पांजली वाहूनी
*
केवडा शमी पत्री दुर्वांकुर जुडी हिरवी
तुज संगे सुंदर सजली सारी सुमने बरवी
*
धूपदीप नैवेद्य अन् भान हरपून आरती
कर्ता करविता तू देवा आलो चरणाप्रती
*
जाणली थोरवी तू रे भक्तीभावाचा भुकेला
सकलांचा स्वामी जाणीसी चौसष्ट कला
*
सकळीक मनी स्मरण भालचंद्रा लंबोदरा
तू आराध्य दैवत कृष्णपिंगाक्षा कृपाकरा
*
गौरीसुता बुद्धिनाथा बुद्धिप्रिया बुद्धीदाता
साष्टांग नमन करीते मी तुला रे वरदवंता!!!
☆
© सुश्री नीलिमा खरे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈