सुश्री अपर्णा परांजपे
कवितेचा उत्सव
☆ आतुरता आगमनाची… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
(काय विरोधाभास हा.. )
☆
जीवन खरा विरोधाभास
कधी नको काही मजला
कधी व्याकूळ आस
जीवन खरा विरोधाभास||धृ||
*
“श्रेयस” शिकता शिकता,
“प्रेयस” निसटले काही
“प्रेयस” शिकले जेव्हा
“श्रेयस” निसटते काही
“उभय” साधले जेव्हा
नाही कोणती आस..
जीवन खरा विरोधाभास||१||
*
प्रेम करू गेलो तर द्वेष मनी उमटला
द्वेष करू गेलो तर प्रेम हृदयी ठाकले
“उभय” साधले ( निर्लेपता) जेव्हा नाही कोणती आस
जीवन खरा विरोधाभास||२||
*
ज्ञानार्जन करता करता
अध्यात्म कसा विसरलो
अध्यात्म साधता साधता
ज्ञान कसे सुटले?
“उभय” साधले जेव्हा नाही कोणती आस
जीवन खरा विरोधाभास||३||
*
“मी मी” म्हणता म्हणता
“परमात्मा” कसा निसटला
परमात्मा आतच असूनी
(जीव )दूर कसा भरकटला
“उभय” साधले जेव्हा
नाही कोणती आस
जीवन खरा विरोधाभास||३||
*
विरोध हाच “भास” आहे
हेच समजले जेव्हा
वर्तूळ जाहले पूर्ण
“मी पण” सुटले जेव्हा
“उभय” साधले जेव्हा
नाही कोणती आस
जीवन खरा विरोधाभास||४||
*
विरोधातच जीवन फुलते
“अद्वैत” कळण्याकरता
अद्वैत शिल्लक उरले
विरोध संपण्याकरिता
“उभय” साधले जेव्हा
नाही कोणती आस
जीवन खरा विरोधाभास||५||
*
आतच ईश्वर आहे
रममाण जीव हा झाला
“मी मी” करता करता
“आतच” तल्लीन झाला
उभय साधले जेव्हा
नाही कोणती आस
जीवन “नाही” विरोधाभास || ६||
*
जीवन पूर्णत्वाची रास
जीवन पूर्णत्वाची आरास…
नरनारायण मीलन घडता
“नाही” विरोधाभास…..
☆
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈