सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ पाऊल खुणा… मनी रुजल्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
☆
अलगद उचलून हात बाजूला
सोडून गेला कान्हा मजला !
साद तयाला घालीत गेले,
मनी उमटल्या पाऊलखुणा !
*
एकटी राहिली यमुना तटी,
राधा कदंब वृक्षाखाली,
वाट पहाते कान्ह्याची मनी,
मनात रुजे प्रीती आगळी !
*
मोरपीस घेऊनी प्रीतीचे,
सोडून गेला कान्हा तिला !
पण कान्ह्याची प्रीत निराळी,
शिरी घेई राधेच्या प्रीतीला !
*
मनी रुजल्या प्रीतीचा गंध,
आसमंती तो दरवळला !
जेथे कान्हा, तेथे राधा,
आनंद मनी तो फुलला !
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈