सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ कवितेचा उत्सव ☆ पतंग… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आशेच्या पतंगा वरी,
झुले मानवी सृष्टी!
रंगबिरंगी रूप तिचे,
हलेना त्यावरुनी दृष्टी!
पतंग ठेविला अंतराळी,
निसर्गावर मात करी!
सुटून गेली मानवा हाती,
त्याची संयमाची दोरी!
परमेश्वराच्या हाती होते,
मांजाचे ते रीळ !
मुक्त सोडले मानवाला,
नाही राहिली खीळ!
मांजा वरची पकड ‘त्याची’,
होती घट्ट धरलेली!
ढील त्याने देताच जराशी,
पतंग जाई उंच आभाळी!
दु: स्वप्नाचे वर्षआपले,
घेवून जा रे आभाळी!
फिरून येता घेऊन ये तू,
सुवर्ण किरणे ती सोनसळी!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈