डॉ. मधुवंती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ काही चारोळ्या… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆
☆
१.
ओंजळभर वेचावीत सुगंधित फुले
पडलाय मखमली अलवार प्राजक्तसडा
किती समजावलं मनाला हळुवार
तरी एकटक पहात रहातो हा जीव वेडा
२.
श्रावणसरी बरसल्या अन् फुलले चाफे
चाफ्यातून डोकावते आरस्पानी सौंदर्य
मनाच्या अंधुकशा गाभाऱ्यात तेवणारे
तेजस्वी झळाळी आणणारे अवीट माधुर्य
३.
मंगळागौरीच्या खेळात सजते श्रावण गीत
झिम्मा फुगडी आनंदात सरी कोसळती
माहेरच्या अंगणात गोपींचा चढे थाटमाट
कान्हा व्याकूळ आसवे गाली ओघळती
४.
सणांची ही रेलचेल गोपी माहेरात दंग
गाई गुरे कान्ह्यासाठी आणि आठवणींचा संग
कधी संपेल हा ऋतू कधी भेटेल प्रेमिका
मनातील सरींमध्ये कधी भिजेल राधिका
☆
© डॉ. मधुवंती कुलकर्णी
जि.सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈