डॉ. सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ यावेळी श्रावण… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
खूप वेदनादायी
मावळलेला हर्ष
टोचणारी हिरवळ
क्षणात करपवणारे ऊन
वेदनेने चिंब करणारा पाऊस
ऊन सावलीच्या खेळात
होरपळणारा विलाप
हृदय पिळवटणारा होता.
यावेळी श्रावण वेगळाच होता.
*
कळीच्या पाकळ्या विस्कटल्या
फुले चुरगळून
मातीत मिसळली
त्यांचा आक्रोश आसमंताला
अस्वस्थ मेणबत्ती विझून
न दिसणाऱ्या आसवांचा
पूर आला होता.
मनामनांतला क्रोध
असहाय्य होऊन
रस्त्यावर सांडत होता.
यावेळी श्रावण वेगळाच होता.
*
श्रावणी सुंदर हिरवळीवर
फुलराणी खेळत होत्या,
कुणी शाळकरी, तर कुणी डॉक्टर मुली,
मनमुराद बागडत…
आपल्याच कामात रममाण होत्या..
कुणी क्रूर अमानवी विकृतीने
घात केला.
कळ्यांच्या मनातला
स्वप्तरंगी इंद्रधनु तोडला होता
यावेळी श्रावण वेगळाच होता.
यावेळी श्रावण…
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈