डॉ. सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ काक… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
काव काव करी | एरव्ही कावळा
हाकलती त्याला | सारेजण
आठवतो काक | तिसरे दिवशी
पितृपक्ष म्हाळ | दोन्ही वेळी
आशा ठेवी कसा | गत प्राण देह ?
पोटभर द्या रे | जीतेपणी
जीतेपणी छळ | द्वेष गोळा करी
मेल्यावर का रे | स्नेह दाटे
तिसरा, तेरावा | श्राद्ध वा तर्पण
जीभेचे चोचले | गोडधोड
सोवळे ओवळे | श्राद्ध अंधश्रद्धा
दवा उपचारा | नड असे
अशी रे कितीशी | कावळ्यांची भूक |
नासाडी अन्नाची | नको करु
तहानेला पाणी | भूकेलेल्या अन्न
हेची पुण्य कर्म | संतवाणी
सोना म्हणे मग | मिळे खरी मुक्ती
थोडेसे चिंतन | विवेकाशी
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈