सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “तो आणि मी…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
तो आणि मी
खूप दिवसांनी
एका निवांत क्षणी
भेट सुंदर घडली….
*
रुसलेली खळी
खुदकन हसली
गालावरती छान
लाली पसरली….
*
डोळ्यांत पाणी
ओठांवर गाणी
त्याच्या माझ्या भेटीची
अजब कहाणी….
*
सतत जवळ असूनी
भेट घडत नाही
तडफड भेटीची
काही केल्या संपत नाही…
*
काढून वेळात वेळ
जमला आज मेळ
संपवून टाकला मग
लपाछपीचा खेळ…..
*
रोज रोजचे ते
दुरुन पाहणे
होता नजरा नजर
स्वतः स रोखणे….
*
आज मात्र घडले
डोळ्यात पाहणे
खोलवर जाऊन
तळ मनाचा शोधणे….
*
तो आणि मी
उत्सुकता किती
जगाला मात्र तो
दिसतच नाही….
*
सर्वांसोबत असतानाही
मनात तो दडलेला
पण कधीच येतं नाही
जगासमोर भेटीला….
*
प्रेम आमचे एकमेकांवर नितांत
जगाच्या गर्दीत करते आकांत
मोकळ्या क्षणी देतो दृष्टांत
सखा तो माझा नाव त्याचे एकांत….
*
एकटेपणाची नसते भीती
एकांत म्हणजे थोडी शांती
अखंड असतो तो सोबती
जडावी लागते फक्त त्याच्यावर प्रीती..
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈