कवी श्री वैभव जोशी
☆ कवितेचा उत्सव ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे
कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांग
देणे घेणे उतू गेले फिटले ना पांग
आता कशी श्वासांवर लावायाची बोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली
कधीकाळी होते इथे एक गर्द रान
एका बहराची ज्याने मिरवली आण
सरूपाला अरुपाची जाहली सवय
तेंव्हाचे हे भय ज्याचे झाले आता वय
एका खिळ्यासाठी कुणी जोपासावी ढोली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली
आता माझ्या प्रार्थनेत तेवढा ना पीळ
आणि तुझ्या निळाईत नाही घननीळ
मंदिराच्या मंडपात मशिदीचा पीर
जीव ऐलतीर आणि डोळे पैलतीर
कोरड्या पात्रात उभी आठवण ओली
माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली
– कवी श्री वैभव जोशी
चित्र – साभार फेसबुक वाल
(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)
प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈