श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ पत्र… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
नका येऊ पुसाया हाल माझे
सुखांनो, एवढे ऐकाल माझे..?
*
खरा ना आजचा ‘त्यांचा’ जिव्हाळा
हसू त्यांनीच केले काल माझे
*
मला स्वाधीन केले वादळांच्या
(म्हणे की, वागणे बेताल माझे)
*
कितीही द्या, कटोरा हा रिकामा
जिणे आजन्म हे कंगाल माझे
*
दगे या माणसांचे,या ऋतूंचे
सुकावे रे कसे हे गाल माझे
*
जगाचे…जीवनाचे रंग खोटे
अरे! त्यानेच डोळे लाल माझे
*
नको ते बंगले बंदिस्त त्यांचे
खुल्या दुःखा-सुखांचे पाल माझे
*
शरीराचे तुम्ही सोसाल ओझे
कसे अश्रू तुम्ही पेलाल माझे?
*
जणू मी वादळीवाऱ्याप्रमाणे
कुठूनी पाय रे खेचाल माझे
*
भिजावे घाम.. अश्रूंनी पुन्हा मी
असे हंगाम सालोसाल माझे
*
तुझी गे भेट झाली..प्रीत लाभे
बने आयुष्य मालामाल माझे
*
कशी सांगू कुणा माझी खुशाली
कधी डोळे तुम्ही वाचाल माझे?
*
‘तुझा आधार वाटे जीवनाला…’
निनावी पत्र हे टाकाल माझे..?
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈