श्री तुकाराम दादा पाटील
☆ कवितेचा उत्सव ☆ गुंता…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
मला कळाले ख-या सुखाला किती आसरा उन्हात आहे
तरी तसेही चंद्र चांदणे तुझ्या नि माझ्या मनात आहे.
कुणी नभाच्या आसपास या फिरेल तेव्हा कळेल त्याला
माया ममता लळा जिव्हाळा किती साठला नभात आहे
टपोरलेल्या कुंदकळ्यांचा गंध सुगंधी कळून आला
अवतीभवती फिरतो भुंगा गातो गाणे सुरात आहे
वचन कुणाला कुणी द्यायचे ज्याचा त्याचा असे मामला
शब्द दिलेला निभावण्याची रीत खरी या जगात आहे
सुटायचातो सुटेल अंती तुझ्या मनाचा अवघड गुंता
लढणे कुढणे धडपडणे तर अविरत चालू उरात आहे
फसवाफसवी करत जगाची फुकटपासरी जगू लागले
समाज वेडा बांडगुळांची एक पोसतो जमात आहे
मना मारुनी जगता जगता या देहाचे झिजते चंदन
कष्टाची पण गोड चवीची एक भाकरी घरात आहे.
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈