डॉ. माधुरी जोशी
कवितेचा उत्सव
☆ घट भरला अमृताचा… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆
☆
घट भरला अमृताचा
घट सांडे आनंदाचा
नवरात्रीच्या दिवसांचा
समृद्धीच्या नवीन खुणांचा !!
*
वर्षेचे काम झाले
भूमी भिजून आतूर
कोणते बीज अंकुरे
प्रकटतील नव अंकुर !!
*
घट गर्द दाट उगवून
सांगेल योग्य हे रोप
ऊब देत तेवत राहील
गाभारी नंदादीप !!
*
किती सुंदर भासे पूजा
सजला कलश देखणा
श्रीफल अन् आम्रपाने
मंगलतेच्या या खुणा!!
*
चांदण्या तगरीच्या वलयी
सुवर्ण गंध सुकुमार
देवीची नऊ रुपे करिती
स्त्री शक्तीचा जागर!!
*
रात्रंदिन तेवत राही
नंदादीप तो स्नेहाचा
तो प्रकाश अन् ते तेज
ओनामा भविष्याचा !!
*
म्हणुनीच घटस्थापना
जणू निसर्ग प्रयोगशाळा
आनंदी दिवाळी दसरा
हासेल सुखाने मळा !!
☆
© डॉ.माधुरी जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈