सुश्री अरुणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ तुला पाहता… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
☆
मी तुला पाहता बावरले
मम चित्त कसे हे थरथरले॥धृ॥
*
झंझावातासम तो आला
कधी कसा तो नाही कळला
मनी माझिया कायम वसला
मम ह्रदय कसे हे धडधडले॥१॥
मी तुला पाहता….
*
ओढ अशी मज काय लागली
नजर तुझ्यावर भिरभिरली
नजरेचे हे भाव बोलके
ते या मुग्धेला उमजविले॥२॥
मी तुला पाहता…
*
वाटे मजसी करी धरावे
मधुर भाषणे पुलकित व्हावे
नजरेचा तव वेध घेतसे
देहभान माझे ना उरले ॥३॥
मी तुला पाहता…
*
तळमळ जीवा तव भेटीची
आस एक मज सहवासाची
नकोत वाटे अशी बंधने
धावत तुजपाशी रे आले॥४॥
*
मी तुला पाहता बावरले
मम चित्त कसे हे थरथरले॥
☆
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈