श्री नितीन सुभाष चंदनशिवे
कवितेचा उत्सव
☆ “भारतीय पाहुणचार…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
☆
तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना
तू वायफायचा पासवर्ड देशील
मी तांब्याभर पाणी देईन
बसायला चटई टाकीन.
*
तू विचारशील काय काम काढलं?
मी म्हणेन बरं केलं आलात कालच आठवण काढली होती.
तुझी बायको बघत बसेल
अनोळखी वाटतील सगळे तिला.
*
ती विचारेल दबकत थंड घेणार की गरम?
माझी बायको मात्र
ओळख नसतानाही जवळची वाटेल..
बशीत सांडेपर्यंत चहा भरेल..
*
तुझी मुलं गेम खेळत असतील
आणि माझी मुलं
त्यांच्या मांडीवर जाऊन खेळतील..
*
तुला चिंता रात्रीच्या जेवणाची, झोपण्याची..
मी मात्र देणेकरी शोधीन
पुरणपोळीचा बेत ठरेल
दाटीवाटीने अंथरूण टाकीन
*
गप्पा मारत रात्र जाईल
सुख दुःख वाटता येईल..
पाहुणे जाताना तुला फक्त
थँक्स म्हणतील
*
तुही गॅलरीत उभा राहून
बाय बाय करत राहशील
बायको फार सुंदर हसेल तुझी..
तीही तुला मिठी मारून दाद देईल
*
तुझ्या पाहुणचाराला
माझ्या घरात मात्र
सगळ्यांचे डोळे भरतील
लेकरं बायको आशीर्वाद घेतील
*
पुन्हा यायचंच म्हणून हक्काने वचन घेतलं जाईल..
नजरेच्या टप्प्यापलीकडे गाडी जाईपर्यंत
निरोपाची भाषा हलत्या हाताला असेल
कळ असेल काळजात फार ओली
*
हुंदके गातील प्रेमाची गाणी
फरक एवढा साधा आहे मित्रा
तू कुठे राहतोस माहीत नाही
… पण मी भारतात राहतो एवढं नक्की..
☆
कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈