प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ कशी घडणार सांगा…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
रामापाशी राहूनही जन उपाशी उपाशी
कशी घडणार सांगा, सांगा गंगा आणि काशी…
*
सोडा सोडा हो जन हो काम क्रोध आणि दंभ
मग जातील निघून शुंभ आणि तो निशुंभ
करा घर हो देवाचे मनाचे ते देवालय
मनाभोवती फिरेल रामरायाचे वलय…
*
नका देव देव करू देव माणसात पहा
तुम्ही माणूस बनूनी माणसात नित्य रहा
नको कपटाचे धनी नका बनू हो संशयी
आहे फारच कृपाळू पंढरीत असे आई..
*
नाही बोलवत कुणा सांगे ठेवा हो मनात
मी श्वासात श्वासात तुमच्याच हो प्राणात
का हो शोधता मला त्या तीर्थक्षेत्री देवालयी
किती वेळा सांगितले पाठीराखा मीच आई…
*
आधी मन करा शुद्ध राग लोभ द्वेष सोडा
असूयेचा विषभरा काटा मनातून काढा काढा
घर होताच शुद्ध ते रामरायाच येईल
खांद्यावरती घेऊन पैलतीरासी नेईल …
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈