श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 259
☆ भूमीवरील तारे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
*
पाणी जमीन सारे झाले कसे विकाऊ
माती तुझे ढिगारे झाले कसे विकाऊ
*
विस्तारले शहर हे दर्या तुझ्याच भवती
सारेच हे किनारे झाले कसे विकाऊ
*
झाले शिकून मोठे अन मागतात हुंडा
भूमीवरील तारे झाले कसे विकाऊ
*
पैसा किती अघोरी झाला जगात आहे
अक्रोश आणि नारे झाले कसे विकाऊ
*
राष्ट्रीय मान्यतेचा पक्षात एक पक्षी
त्याचेच हे पिसारे झाले कसे विकाऊ
*
पाणी नळातले हे आकाश फिरुन आले
बागेतले फवारे झाले कसे विकाऊ
*
लावून आज एसी होतो जरा पहुडलो
आले मनात वारे झाले कसे विकाऊ
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈