सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ दिवाळी…🪔 ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
☆
शत दीप तेवताना, उजळो ज्योत अंतरीची,
स्नेहभावासंगे आज, जपा, कृतज्ञता मनी!
वसुबारसेला करिता, पूजा गाय-वासराची,
अन्नदाता कृषिवल, नको विसराया आम्ही!
जन्मदाते माय-बाप, गुरूजन, आप्त-स्नेही,
संस्काराचे दिले धन, मशागत या मनाची!
आज नमूया तयांना, ठेवूनिया माथा पायी,
हात डोईवर त्यांचा, आशीर्वादाची शिदोरी!
धनत्रयोदशीला पूजता, धन आणि धन्वंतरी,
सामाजिक स्वास्थ्य आहे, आपलीच बांधिलकी!
अज्ञान नि दुर्गुणांचा, नरकासुर हा मारूनी,
सन्मार्गाने जोडू धन, हीच पूजा लक्षुमीची!
जनकल्याणाचे भान, सय बलि-वामनाची,
चोख व्यापार – व्यवहार, खरी पूजा चोपडीची!
करी दृढ यमद्वितिया, भाऊ-बहिणीची प्रिती,
यम-धर्माचे स्मरण, नित्य असावे जीवनी!
संगे पंचपक्वान्नांच्या, करता दिवाळी साजरी,
विसरा न वंचितांना, घास भुकेल्याच्या मुखी!
सण-वार, परंपरा, जपणूक संस्कृतीची,
समाधान लाभे मना, घरी-दारी, सुख-शांती !
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈