श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

दिव्यात ज्योती जळत राहिली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

 तूफानांशी लढत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 रक्ताला या मनस्वितेचा

 जन्मजात अभिशाप असावा

 म्हणुन कदाचित घुमटामध्ये

 नाद निनावी घुमत असावा

*

 सूर आतला जपत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 वर्मावरती घाव कुणाचा

 छिन्नभिन्न नभ, धरा फाटली

 हळूहळू मी केली गोळा

 शकले माझी विखूरलेली

*

 राखेतुनही उठत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 अभिजाताच्या साहित्याने

 अक्षरांस या दिधली दीक्षा

 एकच भाषा रक्ताश्रूंची

 एकच अग्नी, अग्निपरीक्षा

*

 मंत्र दिशांचे पठत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 कधी अचानक गोठुन गेले

 प्राणामधले निर्झर सारे

 माझ्या सोबत अंत कथेचा

 वाटे आता सरले सारे

*

 घटात अमृत भरत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 सवंग पेठा अनुबंधाच्या

 लागू होत्या अटी नि शर्ती

 उपचारास्तव केवळ उरल्या

 उचंबळाच्या रेशिमगाठी

*

 बहिष्कृतासम भ्रमत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 सरतिल दुःखे विझतिल वणवे

 गातिल पक्षी रानोरानी

 वीराण्यांवर निशागितांच्या

 झरेल नक्षत्रांचे पाणी

*

 स्वप्नास्तव या जगत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments