सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ सुगी… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
घाम जिरला जिरला
पिकं आलया तुर्याला
जणू शरदाचं चांदणं
जखडलं शिवाराला
*
पिकं आलया भराला
चालं सुगीचा घयटा
घाई घाईच्या चालीनं
चालं रानाकडं वाटा
*
नको येऊस पावसा
नको पदराची लुटं
भल्या आशेनं ठेवली
होती कुरीवरी मुठ
*
नाय कुठला आसरा
शेतावरी जीव सारा
अवकाळी पावसाचा
नकोच रं गळी फासा
*
सारं जग मज म्हणे
हाय जगाचा पोशिंदा
भुख भागवितो माझी
खाऊन भाकर कांदा
*
धन-धान्याच्या रासी
हे भाग्य मजपासी
गाढ झोपेत निजतो
कधी राहून उपासी
*
येती सुगीचं दिस
हाच दिवाळी दसरा
शरदाच्या चांदण्याचा
मळणीला तो आसरा
*
दिस कलला मिटाया
लखलख पाय वाटा
कष्टा-भाग्यानी उजळं
माझा कुणब्याचा ओटा
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈