सुश्री स्वाती सुरंगळीकर
परिचय
शिक्षण : MSc BEd, Ex लेक्चरर (नागपुर)
कवयित्री- एकपात्री कलाकार
- कवितांचे केवळ वाचन ;पठण किंवा गायन न करता माफक देहबोली आणि वाचिक अभिनयातून कविता सादर करण्याची वेगळी शैली.
- गेल्या 25 वर्षांपासून ; देश विदेशात (अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई ) काव्य सादरीकरणाचे एकपात्री प्रयोग सुरू.”दिलखुलास” चा 500 वा प्रयोग नुकताच नागपूर येथे सादर झाला.
- चारोळी संग्रह, ३ कवितासंग्रह
- काव्यवाचनाची ध्वनीफीत आणि एकपात्री कार्यक्रमाची DVD प्रकाशित.
- इंटरनॅशनल पोएट्री फेस्टीव्हल अ भा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, औंध साहित्य संमेलन (पुणे), पुणे फेस्टिवल, भीमाफेस्टिवल, अ .भा. नाट्य संमेलन नागपूर
- इ टीवी मराठी च्या साहित्य दरबार कार्यक्रमात सहभाग.
सन्मान –
- वर्ष २०२२ चा मानाचा “बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार” प्राप्त.
- काव्यशिल्प पुणे च्या काव्यस्पर्धेत प्रथम पुरस्कार;
- रंगत संगत प्रतिष्ठान चा “हास्यरंगत “सन्मान;
- कै माई देशपांडे प्रतिष्ठान चा काव्यगौरव पुरस्कार;
- ‘पद्मगंधा प्रतिष्ठान‘ नागपुरचा “काव्यपद्म” व’अभिव्यक्ती’ ‘वैदर्भीय लेखिका संस्थेचा, “लक्षवेधी कवयित्री” सन्मान
कवितेचा उत्सव
☆ अनासक्त… ☆ सुश्री स्वाती सुरंगळीकर ☆
☆
त्याच्या मुखी हरिनाम ,
तो भक्तीत रंगलेला…
तीही प्रपंचात दंग,
करी संसार चांगला !
*
सदा त्याच्या वागण्यात,
विरक्ती ही दाटलेली…
तिची सर्वांवर छाया,
नाही माया आटलेली!
*
विठोबाच्या दर्शनाला,
निघाली घरून दोघं…
डोईवर होतं थोडं,
घर-संसाराचं ओझं !
*
आड-वाटेवर त्याने,
पाहिले सोन्याचे कडे…
कसे लपवावे त्यास?
मनामध्ये प्रश्न पडे !
*
या संसारी बायकोचे,
जर का गेले लक्ष…
ती घेईल उचलून,
आहे ना संसारदक्ष !
*
कड्यावर हळू त्याने,
लोटली थोडीशी माती…
निघाला वेगाने पुढे,
घेत कानोसा मागुती !
(चमकून ती म्हणाली..)
अहो ! काय केले तुम्ही?
मती तुमची फिरली!
सांगा तुम्ही कशापायी?
माती ,मातीनं झाकली !
*
गेला तुम्ही विसरून,
माऊलीची शिकवण…
सोने चांदी हीरे मोती,
असती मृत्तिकेसमान !
असती मृत्तिकेसमान !!
☆
© सुश्री स्वाती सुरंगळीकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈