श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ अनोळखी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
कधी तरी एखाद्या भयाण शांत वेळी
उचंबळूनयेतो मनाचा तळ आक्रस्ताळी
आकाश घुमवत जाते एक किंकाळी
तमा न बाळगता एकाकी असल्याची…
जगण्याच्या अनावर ओढीन जगलेले
पोरके दिवस आठवतात
हल्लेखोरासारखे येतात अंगावर
तेव्हा तरी मी कुठे असतो माझ्यात.
भलत्याच क्रांतीकारक गर्जनात
वाहून गेलेला असतो दूर दूर आसमंतात…
पुन्हा माझं अस्तित्व गोळा करायला
खूप करावे लागतात सायास
तरीही असतोच काही अंशी विखूरलेला.
इथेतिथे पडद्यामागे अस्तित्वाच्या
भविष्याचे करत अवलोकन
भयाण असणा-या…
एकटाच, अनोळखी
मलाच मी ओळखत नसलेला…
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈