प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ जगणे मिरास आहे…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
जगणेच प्रत्येकाचे जणू काही मिरास आहे
अंतरी कोपरा एक पण नेहमी उदास आहे…
*
मिरविती वर्ख सोन्याचे पोकळ दिमाख आहे
लक्तरे पाहूनी सारी मन नेहमी निराश आहे..
*
लावूनी दात सोन्याचे टाकती मुखा उजळून
दुर्गंधी लोपते ना ती तर उधाण आहे…
*
काजळी काळजात लपणार कशी ती सांगा
उलताच ओठ मग वाणीत शाप आहे…
*
हा वर्ख हा मुलामा निघताच दिसती जखमा
कातडीत लपला नर श्वापद भयंकर आहे…
*
किती रूप देखणे पण का नासके हो फळ
कळ अंतरात येते दुखणे जुनेच आहे…
*
होणार शापमुक्त होणार कधी शहाणा
आशेवरी तो देव माणूस हा “खकाणा”…
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈