मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझ्यातुन मी मला वगळले… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

माझ्यातुन मी मला वगळले… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

 माझ्यातुन मी मला वगळले

 तुटे पिंजरा विमुक्त पक्षी

 मिटल्या पंखां गगन लाभले

*

 माझ्यातुन मी मला वगळले

 परिधीमधल्या प्रत्येकाशी

 जन्मबंध मग सहजी जुळले

*

 माझ्यातुन मी मला वगळले

 श्रवणी घेता त्यांच्या गाथा

 मौनही माझे धन्य जाहले

*

 माझ्यातुन मी मला वगळले

 नभ करुणेचे रुजले ह्रदयी

 शिवार माझे नंदन झाले

*

 माझ्यातुन मी मला वगळले

 रंगविलेल्या माझ्या चित्रा

 दूर राहुनी बघता आले

*

 माझ्यातुन मी मला वगळले

 परदुःखांना माझ्या देशी

 बिनपरवाना शिरता आले

*

 माझ्यातुन मी मला वगळले

 भिजत राहिलो जन्मजळी पण

 कमलपत्र मज होता आले

*

 माझ्यातुन मी मला वगळले

 नोंदवहीतुन परंतु त्यांच्या

 मला वजा ना होता आले !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈