श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ वसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
देव आहे तसा भेटला पाहिजे
छंद त्याचा मला लागला पाहिजे
*
भाव आहे तिथे देव आहे म्हणे
देव देहातला जागला पाहिजे
*
व्यर्थ दवडू कसा जन्म वाया इथे
अर्थ जगण्यासही लाभला पाहिजे
*
ध्येय गाठायला नित्य राबायचे
हात कामामध्ये गुंतला पाहिजे
*
माणसे जोडण्या माणसांना जपा
अंतरी भावही चांगला पाहिजे
*
प्रेम आहे तिथे हात देणे बरे
आसरा जीवनी शोधला पाहिजे
*
कर्मकांडांतली अंधश्रद्धा नको
घेतलेला वसा पाळला पाहिजे
*
वासनांची भुते दूर टाळायला
संत तुकया पुरा वाचला पाहिजे
*
आज आहे तसे जगत जावे कसे
विषय लोकांपुढे मांडला पाहिजे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈