मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांगा बाई कधी रिकामी असते का? ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ सांगा बाई कधी रिकामी असते का ? ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
सांगा बाई कधी रिकामी असते का?
कुठेतरी ठेवलेली पोटली
सापडतेच ना?
डाळींच्या डब्यात गव्हाच्या पोत्यात
कुठे न कुठे पैसे सापडतात ना?
बाई ची नजर आणि भविष्याचा विचार खराच असतो ना?
सांगा बाई कधी रिकामी असते का?
*
डबा जरी रिकामा असला तरी वळचणीला सापडतच ना,
पोत्याची थप्पी नसली तरी उतरंडीत धान्य असतंच ना,
भाजी नसेलतर आमटी शिजतेच ना.
सांगा बाई कधी रिकामी असते का?
*
घर सांभाळून काम करतेच ना,
बरोबरीने काम करून शेरडं, करडं सांभाळतेच ना,
ठेवती जपून पैसापाणी वेळेनुसार देतेच ना,
जेव्हा कुणाचा आधार मिळत नाही तेंव्हा मदत करतेच ना
सांगा बाई कधी रिकामी असते का?
*
का होते पुरुषांचेच कौतुक नेहमी?
बाई कौतुकाची अधिकारी असतेच ना,
संकटाना तोंड देऊन तीही संसार सावरतेच ना,
गोड बोलून नाती जपून एकोप्याने राहतेच ना,
तरीही बाईच दोषी असं म्हणतात च का?
सांगा बाई कधी रिकामी असते का?
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈