मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याच्या होकाराला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्याच्या होकाराला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

आयुष्याच्या होकाराला, कौल जरासा लाविन म्हणतो

वाट संपली वाटचाल पण, अजुन जराशी करीन म्हणतो

*

जागविल्या मी कितीक राती, नभांगणीचे मोजत तारे

जपमाळेमधि स्वप्नांच्या ह्या, नवीन तारे ओविन म्हणतो

*

अंतर्यामी कुसुमांच्या मी, शिरता वाटे कवी जाहलो

ह्रदयकवाडे काट्यांचीही, जरा किलकिली करीन म्हणतो

*

नकार होता ह्या मातीचा, बीज उधळले वाऱ्यावर मी

सुदूर कोठे असेल रुजले, शोध तयाचा घेइन म्हणतो

*

कालपरत्वे गहाळ झाली, काळजातली काही गावे

प्राणप्रतिष्ठा पुन्हा तयांची, नकाशात मी करीन म्हणतो

*

द्यावी बुडवुन भोगशिदोरी, तळ नसलेल्या अथांग डोही

पुन्हा लिहाया नवी कहाणी, कागद कोरा होइन म्हणतो

*

विलया न्यावी कशी सागरा, मलीन अजुनी इतुकी गंगा

कुठे अजूनी स्वर्ण कसाला, अजुन जळत मी राहिन म्हणतो !

(वनहरिणी )

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈