श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 264
☆ भेटतो चांदवा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
माझ्या प्रीतीच्या फुलात, रात्री पाहतो चांदवा
आकाशात नाही तरी, आहे भेटतो चांदवा
*
मीही भाग्यवंत आहे, चांदण्यांच्या सोबतीने
आहे अंगणात माझ्या, पिंगा घालतो चांदवा
*
आडवाटेचा हा मार्ग, नाही साथ सोडलेली
रोज सोबतीने माझ्या, रस्ता चालतो चांदवा
*
काही दिवसांचा खाडा, ठेवे अंधारात मला
चंद्र किरणेही स्वतःची, देणे टाळतो चांदवा
*
आकाशाच्या गादीवर, त्याला झोप येत नाही
घरी जाण्याच्याचसाठी, घटका मोजतो चांदवा
*
माझी आठवण ठेवली, नाही दुर्लक्षित झालो
माझ्या दारात येऊन, कायम थांबतो चांदवा
*
हाती त्याच्या ना घड्याळ, तरी पाळतो तो वेळा
कामावरती वेळेवर, आहे पोचतो चांदवा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈