प्रा. सौ. सुमती पवार
☆ कवितेचा उत्सव ☆ प्रत्येकच वर्ष कसं…? ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
प्रत्येकच वर्ष कसं, अहो जाईल सुखाचं..?
कधी तरी माप हे, भरणारंच दु:ख्खाचं…
पाचू सारख्या वसुंधरेवर,कधी पेटते आग
तेंव्हा तरी तिचा पहा कुठे चालतो इलाज….?
फुफाट धावे नदी तीत ही पाणी मावत नाही
उन्हाळयात आटते इतकी थेंब ही दिसत नाही
बसते काय ती रडत सांगा? पोटात ठेवते पाणी
खड्डा खोदता मिळते पाणी येता आणिबाणी..
पावसाळ्यातील बहरली,झाडे ओकी बोकी
हिवाळ्यात दिसतात पहा ना फक्त त्यांची डोकी
एक ही पान झाडा वरती तेंव्हा दिसत नाही
झडी लागते तशी ती पाने जाती घाई घाई..
उसळणारा सागर सुद्धा ओहोटीला येतोच
किनाऱ्याला सोडून तो ही आत आत जातोच
वाट पाहतो मग किनारा येईल आता गाज
माझ्यावरती चढेल पुन्हा तुषारांचा साज…
पळस कित्ती लालेलाल तो उन्हाळ्यातच फुलतो
झळा झेलत तप्त उन्हाच्या किती छान तो हसतो
चालायाचेच असे म्हणत हो….
बघा सामोरे जावे…
जे जे येईल समोर ते ते….
आनंदाने… घ्यावे….
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि: ०५/०१/२०२१
वेळ: संध्या.. ६:५०
(९७६३६०५६४२)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈