प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ .. चमच्यांची महती… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
*
चमच्यांची हो महती किती सांगू मी तुम्हाला
उठसुठ मागे मागे नाही धरबंध तोंडाला
लाळ गळते ती किती नाही लाज नि शरम
पोळी भाजतात रोज स्वार्थाचीच ते गरम…
*
चाटूपणा किती किती पाहताच ये शिसारी
मागे मागे फिरतात हे तर अट्टल भिकारी
बांडगुळे ही झाडांची शोषण करून जगती
बिलगती झाडाला नि करती झाडांची दुर्गती..
*
परस्वाधिन हो जिणे नाही वकुब काडीचा
झेंडा धरावा हो हाती रोज चालत्या गाडीचा
जिथे भाजेल हो पोळी तिथे लागती जळवा
जाती सोडून हे केव्हा नाही भरोसा धरावा…
*
जिथे दिसेल हो तूप तिथे बुडती चमचे
तूप संपताच पहा नाही होणार तुमचे
केव्हा मारतील लाथ केव्हा सोडतील साथ
लाचार नि लाळघोटी निलाजरी ही जमात..
*
दूर ठेवा हो चमचे बदनाम ते करती
तोंडावर गोड गोड खिसे आपुले भरती
गोड गोड जो बोलतो पोटी छद्म असे त्याच्या
फटकळ परवडे हे तर करतात लोच्या..
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈