सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ सलाम… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
कधी दुष्काळ सुका, तर कधी येतो ओला
दुःखाच्याच रेघुट्या, आमच्या नशिबाला.
ठिगळं जोडली सतरा, तरी पदर फाटलेला
शेवटी पिकाचा पंचनामा, कागदावरच उरला.
*
सलाम आमुचा जिंकला आणि हारलाही त्याला
**
कुणा ठाव कोण आला अन कोण पडला ?
नाळ आमुच्या कष्टाची, रानच्या बांधाला
धरणीला माय आणि बाप मानतो नभाला
आलेल्या संकटाचं, साकडं घालतो विठूला
*
सलाम आमुचा जिंकला आणि हारलाही त्याला
**
कष्टाच्या घामात रगडतो, जवा आमुचा पागुटा
तवाच रंगतो पुढाऱ्याचा, चकचकीत फेटा
बळी किती जाती, गोड उसाच्या कडू कहाणीला
तवा झळकतं नाव पुढाऱ्याचं, साखर कारखाणदारीला
*
सलाम आमुचा जिंकला आणि हारलाही त्याला
**
सोयाबीन, कपासीचा भाव, सदाच ढासळलेला
बांधावरच्या बाभळीला, फास कर्जाचा टांगलेला
अश्वासनाच्या फुक्या हावंत, श्वास गुदमरलेला
मत माझं देऊनशानी, फक्त जागलो लोकशाहीला
*
सलाम आमुचा जिंकला आणि हारलही त्याला
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈