☆ कवितेचा उत्सव : ललाटरेषा…. ☆ श्री प्रकाश लावंड ☆
माझ्या शिवारात पावसा
मोरासारखं नाचून जा
पानांवर लिहिलेली
हिरवी कविता वाचून जा
तुझे सांडलेले मोती
बघ आता रुजून आलेत
त्यातले शेलके मोती
तुझ्या ओंजळीनं वेचून जा
काळीआई तू उपजाऊ
निर्माणाची उद् गाती
तुझ्या सुपिकतेचा तुरा
माझ्या शेतात खोचून जा
पाखरा, शेतात माझ्या
स्वानंदी भिरभिरत रहा
चिमणीच्या दातानं चार
कोवळे दाणे चोचून जा
मधमाशांनो पाकोळ्यांनो
तुमच्यानंच शेत फुले
परागकण वाटत जा
मधुकण सारे शोषून जा
असाच राहो ऋणानुबंध
शिवार देवते तुझा लळा
माझ्या भाळी एक अमिट
ललाटरेषा खेचून जा
© श्री प्रकाश लावंड
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
??????????
अच्छी रचना