मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मिटे प्रकाशाचे राज्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ मिटे प्रकाशाचे राज्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
मिटे प्रकाशाचे राज्य
पडे काळोखाची मिठी
बंद पापण्यांच्या आत
सैलावती निरगाठी
*
मनातल्या निरगाठी
मनातच सुटतात
पापणीच्या अंधारात
उरातून फुटतात
*
उरी फुटता फुटता
शल्य पापणीच्या काठी
गळणारा अश्रु टिपे
तम हलकेच ओठी
*
या तमसावरती
तिची जडलिय प्रित
तिचे दु:ख चुंबुनीया
प्रकाशी ठेवी हसवीत
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈