सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ न्यायनिवाडा…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(आनंदकंद)
☆
तत्त्वास सिद्ध करण्या वादात जिंकते मी
नाते जपावयाला वादास टाळते मी
*
डाकू मतामतांच्या चिखलात लोळणारे
पंकात पंकजाची का वाट पाहते मी
*
केले कुणी गुन्हे जर आहेत पाठराखे
निष्पाप शोधते अन चौकीत डांबते मी
*
नादान लोक सारे चलतीच आज त्यांची
साधे दिसो कुणीही वेशीस टांगते मी
*
विसरून मानवत्वा संहार होत आहे
खुर्चीत तेच दिसता चित्तास जाळते मी
*
मी व्यक्त होत नाही झुरते मनात माझ्या
अश्रू गिळून अपुले चुप्पीच साधते मी
*
टीका करून काही निर्माण होत नाही
काव्यात मल्लिनाथी सृजनास गाडते मी
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Nice poem by Sau Jyoti Kulkarni
धन्यवाद आमोद
खुपचं छान
खूप सुंदर
खूप छान वास्तव कविता.
छानच हो. पण अशी अगतिकता का? तू तर आजवर इतकं झेललंयस,पेललयस, की आता रणरागिणीची अपेक्षा आहे.