सुश्री नीलम माणगावे
कवितेचा उत्सव
☆ एक संवाद : ताराबाई भावाळकरांशी ☆ सुश्री नीलम माणगावे ☆
मी म्हणाले, ‘एकट्या कशा हो रहाता तुम्ही?’
‘एकटी कुठे?’ त्या सहज म्हणाल्या,
‘मित्र-मैत्रिणींचा मेला असतोच की दिवसभर!’
‘पण रात्री… ’ मी पुन्हा विचारते, ‘ एकटं नाही वाटत?’
‘पुन्हा तेच….. ’ त्या हसून म्हणाल्या, ‘ एकटं का वाटावं?
पुस्तकांचा सहवास किती मोठा! त्यांचे लेखकच काय?
त्यातली पात्रंसुद्धा कुठे झोपू देतात?
सतत बोलतात. चर्चा करतात.
त्यांच्या शंका-कुशंका संपतच नाहीत.
पात्रे तर वेळी-अवेळी कधीही
हसतात – हसवतात, रडतात-रडवतात.
‘आणि लोकसाहित्यातील स्त्रिया?’
‘त्या तर सोडतच नाहीत.
‘सतत गाणी गातात… गोष्टी सांगतात.
हाताला धरून फेर धरतात.
दळायला लावतात. कांडायला धरतात.
रांगोळीच्या रेषा होतात. जगण्यात रंग भारतात.
आणखी काय हवं ? ‘
पुन्हा तो सोशल मीडिया…. तो स्वस्थ कुठे बसू देतो?
अगं, हातात काहीच नसताना,
बंदीगृहात वीस-वीस, पंचवीस- पंचवीस वर्षं
राहिलेल्या नेत्यांनी
अंधार्या, तुटपुंज्या जागेत, इतिहास निर्माण केला.
मग मी स्वत:ला एकटं का समजावं?
एकटी असले तरी एकाकी नाही हं मी!
तिकडे विठ्ठल साद घालतो.
तुकाराम भेटत रहातो.
गहन अंधारात मुक्ताई बोट धरते.
सावित्रीबाई दिवा होते.
हे सारे सोबत असताना
मी एकटी कुठे?
शिवाय, वाचन, आकलन, चिंतन, मनन, लेखन
मला फुरसत कुठे आहे?’
‘खरं आहे. ‘ एखाद्या सदाबहार झाडाकडे बघावे,
तशी त्यांच्याकडे बघत मी म्हणाले,
‘तुम्ही तर अक्षर – सम्राज्ञी !
सम्राज्ञी कधी एकटी नसते.
सारा समाज तिचा असतो.
‘अवघा रंग एक झाला… ’ असं तिचं जगणं.. ’
‘एवढही काही नाही गं’
त्या नम्रपणे म्हणाल्या.
‘तुम्हा सर्वांचं प्रेम ही माझी संपत्ती
अक्षरधन हे माझं ऐश्वर्य
हेच माझं… माझ्या काळजातलं बळ
माझा श्वास… माझा विश्वास
माझ्यासाठी खास
मी बघतच राहिले.
आणि माझ्या लक्षात आलं,
या एवढ्या कणखर कशा?
त्यांच्याच तर आहेत सार्या दिशा
© सुश्री नीलम माणगावे
संपर्क – जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर, मो 9421200421
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈