श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ ।।जीवेत शरद: शतम।। ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
☆
।।जीवेत शरद: शतम।।
डॉ. तारा भावाळकर – शुभेच्छा
आयुष्याची ८५ वर्षे
म्हंटलं तर वाटचाल प्रदीर्घच
पण, चालणे कधी कसे झाले कळलेच नसेल.
कधी पाऊल उचलताना जड झाले असेल.
पायाखालची माती कधी बेसुमार तावली असेल
कधी मातीच बुक्का बनून पायावर गांधली असेल.
कधी टोचले असतील काटे टचकन डोळ्यात पाणी आणीत
कधी फुलली असतील फुले सुगंधाने मन वेढीत
कितीदा आले असतील झेपावत, व्यथा- वेदनांचे सुसाट वारे
तुमच्या खंबीर दृढ मनावर थडकून मुकाट फिरले असतील सारे
कितीकांना दिला असेल घासातला घास तुम्ही
कितीकांना दिला असेल चालण्यासाठी आधाराला हात तुम्ही
कुणाचे ओझे घेतलेत खांद्यावर
कुणाचा आनंदही तुमच्या मुखावर
कितिकांच्या दु:खाने तुमचे डोळे पाणावले असतील
कितिकांचे कष्ट तुमच्या खांद्याने झेलले असतील.
आता वाटचाल अगदी संथ
मनही भारावलेले तृप्त
जीवनाच्या या वळणावर
जगन्नियंता आशीर्वादाचे बोल
तुमच्यासाठी उद्घोषित असेल
कल्याणमस्तु…! कल्याणमस्तु…!
☆
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈