सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ (१) विसर्जन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित गणेश काव्यलेखन स्पर्धा)
(विषय — निरोप, वृत्तबद्ध रचना, वृत्त – लवंगलता)
☆
निरोप तुजला देता देवा कंठ दाटून येतो
पुढल्या वर्षी लवकर यावे प्रार्थना तुला करतो
*
गणेश उत्सव आनंदाचा धामधुमीतच सरला
प्रत्येक दिवस भावभक्तिने प्रसन्नतेचा ठरला
*
गणेश आले पार्थिव मूर्ती प्रतिष्ठापना केली
सुंदर ऐसे मखर सजविले छान सजावट केली
*
दुर्वा पत्री फळा फुलांनी पूजा सुरेख सजली
पंचखाद्य अन मोदक पेढे प्रसाद पाने भरली
*
उच्चरवाने जयघोष करत आरत्या पठण झाले
दहा दिवस हे मंत्र भारले मन तृप्त तृप्त झाले
*
क्षणभंगुर हे जीवन आहे आनंदाने जगणे
कर्तृत्वाचे प्रसाद वाटप सकल जनासी करणे
*
हसत जगावे हसतच जावे कीर्तिरुपाने उरणे
उत्सवात तू हेच सांग*शी मनापासून शिकणे
*
आली अनंत चतुर्दशी ही मन जडावले आता
निरोप कसला बाप्पा सदैव अंतर्यामी असता
*
कुसंगती अन दुर्बुद्धीचे आज विसर्जन व्हावे
मन गाभारी परी गणेशा तू आसनस्थ व्हावे
☆
ज्योत्स्ना तानवडे. पुणे
कवितेचा उत्सव
☆ (२) घट बसले.. ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(आदिमाया आदिशक्ती काव्यलेखन महोत्सव – दहा दिवसीय विशेष काव्यलेखन स्पर्धा)
(विषय — घटस्थापना – (अष्टाक्षरी))
☆
चराचरी भरलेले
तत्व ईश्वरी सजले
नवरात्र घरोघरी
आज हे घट बसले ||
*
आई संस्थापित होते
आज ही घटस्थापना
शस्त्रसज्ज दुर्गामाता
उभी खलनिर्दालना ||
*
रूप घटाचे आगळे
दैवी अस्तित्व पेरते
आदिमाया आदिशक्ती
बीजातून अंकुरते ||
*
शारदीय नवरात्र
करू आईचे पूजन
मन शांत शांत होई
तिचे मंगल दर्शन ||
*
माझ्या देहाच्या घटात
पूजा देवीची मांडली
नेत्रज्योती तेजाळून
मनी आरती गायली ||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈