श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ कॅनवास… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वनहरिणी)
☆
मान्य की माझ्या ह्या जन्मीचा, कॅनवास हा अफाट नव्हता
सटवाईने लिहिला भाळी,विधीलेखही अगम्य नव्हता
*
तशी फारशी नव्हती वळणे,वाट बिकट वा नव्हती खडतर
भरकटणे वा चुकणेबिकणे,वहिवाटेला नव्हते मंजुर
*
जन्मजात पण रक्तामधला,होवु लागला मुंज्या जागा
हळूहळू मग चाकोरीला,ग्रासु लागली पिशाच्चबाधा
*
दावे तोडुन एक वासरू,कळपामधुनी गहाळ झाले
बेछूट आणि उदंड होवुन, झपाटलेल्या रानी आले
*
तसाच झालो बंधमुक्त मी,हद्दीमधुनी हद्दपारही
मोडुन तोडुन सर्व नकाशे,जरा जाहलो विश्वंभरही
*
अरुणप्रभेचे सूर्यास्ताचे,चढणीचे अन् उतरंडीचे
क्षणांत साऱ्या रंग मी भरले,काळजातल्या इंद्रधनूचे
*
रंगत गेला रंगसोहळा, कॅनवासही विराट झाला
मुळे पोचली अथांगात अन् शेंडा माझा गगनी भिडला !
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
khup chchan kavita
chchan kavita