श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ खेळ नवा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
वरवरचे हे वास्वत आहे, विस्तव सारा लपला आहे
फुंकर घालून पहा जरा तू भडका आता उडणे आहे
*
मी सत्याची बाजू घेतो असे बोलणे सोपे आहे
जो तो जाणून आहे, बोलण्यातही गफलत आहे
*
वचने देती तीच तीच अन् असे तीच ती मधाळ भाषा
मूर्ख जाहलो कितीदा तरी मनातील या सुटे न आशा
*
चिखलफेकीचे खेळ चालता शिंतोड्यांना काय कमी
दिवसभराची नसता खात्री कशी द्यायची दीर्घ हमी
*
सौदे जमती फिसकटती, शेंबड्यासही मुकुट हवा
सत्तेसाठी सत्य बदलती लोकशाहीचा खेळ नवा
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈