श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ मनातल्या वनात मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
मनातल्या वनात मी तुलाच खूप शोधले
समोर पाहता तुला मलाच वेड लागले
*
लपूनको उगाचतू ढगात चांदणी परी
हवीसतू मला इथे हळूच भेट अंतरी
तशीच ये समोर तू हळूच टाक पावले
समोर पाहता तुला मलाच वेड लागले
*
दिसेल का मला तुझा तसाच शांत चेहरा
विचारतो तुलाच मी बनून आज बावरा
मनातल्या मनात हे धुके बरेच दाटले
समोर पाहता तुला मलाच वेड लागले
*
भिजून पावसात तू अजून कोरडी कशी
नकोच लाजणे तुझे बनून वाग धाडसी
जगासमोर यायचे नवीन देत दाखले
समोर पाहता तुला मलाच वेड लागले
*
विचार खुंटतो तिथे गती कुठून यायची
वियोग सोसला तरी मने कशी तुटायची
मिळून जायचे पुढे म्हणून दीप लावले
समोर पाहता तुला मलाच वेड लागले
*
जुळून यायला पुन्हा सुरेख योग यायचा
दबून राहिल्यामुळे तसाच व्यर्थ जायचा
रुकार घ्यायचा तुझा म्हणून मौन सोडले
समोर पाहता तुला मलाच वेड लागले
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈