श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ आजी आजोबा… ☆ श्री सुजित कदम ☆
☆
आजी आजोबांशी
रोज मनसोक्त बोलू या
दिवसभरातला थोडा वेळ
त्यांच्यासाठी देऊया…!
*
आजी आजोबा म्हणजे
भर उन्हात सावलीचं झाड
कुशीत घेऊन पुरवत असतात
हवे तेवढे आपले लाड…!
*
वाढत जातं वय आणि ..
थकत जातात त्यांचे पाय
तरीसुद्धा नातवा सोबत
चालत असतात हेच पाय
(धावू लागतात हेच पाय)
*
दूर दूरच्या नातवांसाठी..
आतून जिव तुटत असतो
त्यांच्या आठवणीत आसवांचा
तोल सुध्दा सुटत जातो…!
*
गालावरुन ओघळत जातात
आसवांचे काही थेंब..
तरी सुद्धा वाढत असतं
सर्वांबद्दल त्यांच प्रेम…!
*
दिसत जरी कमी असलं तरी
मनातलं त्यांना नक्की कळतं
प्रश्न अवघड असला तरी
इथे उत्तर नक्की मिळतं..!
*
बाहेरचा राग किती वेळा
आपण ह्यांच्यावरतीच काढतो
कारण नसताना किती वेळा
आपण यांच्यावरच चिडतो.
*
तरीसुद्धा शांतपणे ..
ते घेतात सारे ऐकून,
रात्री आपण झोपल्यावर मग
हळूच जातात डोकावून ..!
*
आठवत असतं त्यांना सुद्धा
“त्यांचं असं बालपण”
आपणच मात्र विसरून जातो
“त्यांचं असं म्हातारपण”..!
*
सुरकुतलेला हात त्यांचा
रोज हातामध्ये घेऊ..
त्यांच्या मनातलं थोडं तरी
जाणून आपण घेऊ..!
*
कितीही असलो मोठे तरी
लहान आपण होऊया
उतार वयातलं बालपण त्यांचं
थोडं समजून घेऊया..!
*
आजी आजोबांशी
रोज मनसोक्त बोलू या
दिवसभरातला थोडा वेळ
त्यांच्यासाठी देऊया…!
☆
© श्री सुजित कदम
मो .. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान कविता सुजित