श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 270
☆ शोकांतिका (धृतराष्ट्र उवाच)… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
संजया, तू जरी कौरवांच्या बाजूने
उभा असलास तरी
तुझ्या बोलण्यातून
मला पांडवांच्या विजयाची गाथा
ऐकू येते आहे.
मी आंधळा असलो तरी
उघड्या कानांनी
आपल्या अपयशाची लक्तरे
वेशीवर टांगलेली पहातो आहे
तुझ्या या रोजच्या संभाषणातून
कौरवांच्या कुठल्याही यशाचा मार्ग
मला समोर दिसत नाही
एकेक करून, आपले सैनिक
रोज आपल्याला सोडून जात आहेत
परतीचा कुठलाच मार्ग
आपल्यासमोर राहिलेला दिसत नाही
अपयशाच्या शेवटपर्यंत
तू असाच बोलत राहणार आहेस का?
तुझ्या या दिव्यदृष्टीपुढे
माझे काहीच चालत नाही
मी तुला आणि मलाही
थांबवू शकत नाही
हीच आजची शोकांतिका आहे…!
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈