श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 271
☆ दळते वाळू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
º
हजार वर्षे दगड घासतो बनते वाळू
किती दूरवर नदी सोबती फिरते वाळू
º
प्रपात पडतो खूप वरूनी दरीत कायम
त्याच्यासोबत वरून खाली पडते वाळू
º
पारदर्शिता वाळूमधली कुणा न दिसली
हे काचेचे रुपडे म्हणजे असते वाळू
º
सिमेंट आणिक वाळूचे या होता मिश्रण
का भीमेच्या पात्रामधली मळते वाळू
º
उघड्यावरती मस्त वावरे जरी कालवर
दोन विटांच्या मधेच आता लपते वाळू
*
नव्या युगाला आरामाची सवय लागली
तेलासाठी ती म्हातारी दळते वाळू
º
या वाळूची सवय अशी की गळून जाते
मरते वेळी अपुल्या हाती नसते वाळू
º
पाठीवरच्या रेषा *
º
तो ओठाने चुंबुन घेई, ओठावरच्या रेषा
भविष्य समजत नाही पाही, हातावरच्या रेषा
º
गप्पांसोबत वाळूवरती, कधी मारल्या होत्या
कुठे राहिल्या पुसून गेल्या, काठावरच्या रेषा
º
तिची काळजी दिसते आहे, मुखकमळावर सारी
जेव्हा जेव्हा पहात होतो, भाळावरच्या रेषा
º
जशी कातडी सोलावी तो, तसेच सोलत होता
तरी जागच्या हलल्या नाही, देठावरच्या रेषा
º
गर्भवतीचा ताण उतरला, बाळाच्या येण्याने
तडतडलेल्या सांगत होत्या, पोटावरच्या रेषा
º
किती सोसले सांगत नाही, काही ती तोंडाने
परंतु सारे सांगत होत्या, पाठीवरच्या रेषा
º
इतिहासाने नोंद घेतली, दोनचार नेत्यांची
सळसळ करती आंदमानच्या, बेटावरच्या रेषा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈