प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ ऋणानुबंध… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
प्रथम ऋण ते परमेशाचे जन्म देतो तोच आम्हा
उठल्यावरती म्हणत चला हो, रामा रामा हरे रामा
उपकृत करते वसुंधरा हो ऋण किती ते मोजा ना
गणना करता सरेल आयु ध्यानी मनी हो तुम्ही घ्याना…
*
चंद्र सूर्य हे रोज उगवती करून पहाना सेवा अशी
हात जोडूनी उभा ठाकतो सहस्त्ररश्मी दाराशी
मातपिता ते कसे मी वर्णू अनंत त्यांचे ऋण शिरी
रक्षणकरण्या पाठवतो तो परमदयाळू श्रीहरी..
*
वसुंधरेची बाळे सारी वृक्ष नि वेली उद्याने
किती फुलवली वसुंधरा ती अमाप त्या सौंदर्याने
पिकपाणी नि धनधान्ये ती खनिजे पाणी रत्ने ही
किती ते देणे वसुंधरेचे अफाट पडतो पाऊस ही…
*
राती चांदणे फुलते कसे हो कुंभ सांडती धरेवरी
रजतपटी तो खेळ खेळतो खड्या चांदणी श्रीहरी
नक्षत्रे ती किती मनोहर नयनपारणे फिटते हो
झुंबर चंद्राचे ते पाहून मनच हरखून जाते हो…
*
वारे वाहती नद्या हासती प्रपात कोसळती मोदे
आम्ही देतो इतके म्हणूनी कधीच केले ना सौदे
अफाट आहे ऋण धरतीचे नारायण तो कृष्णाचे
म्हणून म्हणते व्हा उतराई मुखी नाम राहो त्यांचे…
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈