☆ कवितेचा उत्सव ☆ स्वप्नपालवीची आस ☆ सौ. मनिषा पाटील ☆
वेदनांचा मळवट
नाही ओंजळीत सुख
कुरतडे काही आत
मनामध्ये रुखरुख
कसे गाठू क्षितिजाला
पायी रस्ता सरेना
दाटे आठवांचे नभ
तरी पाऊस झरेना
मधमाशीने फुलांना
दंश जहरी मारिला
तडफड पाकळ्यांची
आता सोसेना जिवाला
असे अवेळी नात्याचे
फूल फूल गळताना
स्वप्नपालवीची आस
कशी छळे जळतान
© सौ. मनिषा पाटील
मु/पोःदेशिंग हरोली
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
वेदनांचा मळवट नाही ओजळीत सुख. स्त्री ची वेदना कवितेतून मांडण्याचा छान प्रयत्न. आवडला