श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ ध्यास ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
तो नभीचा चांद होता की फुलांचा ताटवा
शांतविण्या या मनाला एकदा हो भेटवा
*
ओढणीचा मेघ झाला चांदवा तो झाकला
स्पर्शिण्या परि चांदण्याला जीव गुंतू लागला
*
मी कधी ना पाहिलेले पाहिले हो काल रात्री
लावणीचा शृंगार सारा साठला अद्याप नेत्री
*
एक होती ती डहाळी रातराणीच्या फुलांची
मोग-याची वेल होती की रास होती पाकळ्यांची
*
यौवनाचे गीत होते तो सूर होता आगळा
संयमाला धार होती तो रोख होता वेगळा
*
स्वप्न होते, सत्य होते, काय होता भास तो
गुंतले हे ह्रदय माझे, एक आता ध्यास तो
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप सुंदर कविता सर