सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “प्रेम…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…
नाही आडपडदे, नाही आडवळणं…
नितळ निर्मळ झऱ्यासारखं सतत झुळझुळत असतं
प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…
*
नको जातीपातींचे चढउतार… नको नात्यागोत्यांची कुंपणं
उघड्या बोडक्या खडकावर अल्लाद फ़ुंकूनही फुलणारं
मऊ लुसलुशीत गवत असतं… तसंच अगदी तसंच…
प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…
*
नाही व्यवहाराचा वायदा… नाही परतफेडीचा तगादा
नाही कोणती लिखापढी… नाही कर्तव्याची तागडी…
कारण कर्तव्यात प्रेम असावंच असं नसतं…
आणि प्रेमात तर दुसरं तिसरं काहीच नसतं…
प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…
*
नाही नर – नारी हा भेद, नाही बंधन वयाचे
सारे सान सारे थोर… होती एकाच मापाचे
साऱ्यांसाठी एकच गुबगुबीत मऊ उबदार पांघरूण असतं…
प्रेम म्हणजे प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…
*
अथांग सागर… अमर्याद आभाळ… इवल्याशा मनात दाटलेलं
शेषशाही विष्णू अन घननीळ कृष्ण… तिथेच जणू विसावलेले
मग तिथेच नकळत जन्मलेलं देवत्व असतं…
तिथेच खरं प्रेम… म्हणजे फक्त प्रेमच असतं…
*
प्रेम म्हणजे प्रेम.. म्हणजे फक्त प्रेमच असतं…
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मंजूषा ताई खूप छान कविता